
वाढत्या उष्म्याचा आंबा बागायतींना मोठा फटका
सध्या वाढत्या उष्म्याचा फटका आंबा बागायतींना बसला असून आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती बागायतदारांकडून समोर आली आहे. वाढत्या उष्म्यामुळे फळांवर डाग पडत असून काही फळे पिवळी होत आहेत. तसेच लाखो रुपयांची फवारणी करूनही रोग पडून मोठे नुकसान बागायतदारांच्या पदरी निराशा आली आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने काही उपाय सुचविले असून त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.काही दिवसांपूर्वी तालुक्यात उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे आंबा बागायतदारांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार आंबा फळाचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळे मिळविण्यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना २५ बाय २० सेंमी आकाराची कागदी पिशव्यांचे आवरण घालावे. आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी व प्रत सुधारण्यासाठी १ टक्के पॉटॅशियम नायट्रेटची १० ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. आंबा फळांची फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसातून एकदा १५० ते २०० लीटर पाणी प्रती झाड या प्रमाणात फळे सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. www.konkantoday.com