नादुरूस्त धरणांमुळे टंचाईच्या झळा यावर्षी अधिक
_चार वर्षापूर्वी फुटलेल्या तिवरे धरणासह डेरवणचे नादुरूस्त राजेवाडी आणि यावर्षी गळती लागल्याने पाणी सोडून दिलेले कळवंडे अशा तीन धरणांमुळे तेथील नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी या धरणाच्या नद्यांवर अवलंबून गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गेल्या दोन वर्षात जलजीवन मिनश योजनेंतर्गत तालुक्यात ११० कोटींच्या तब्बल १३२ पाणीयोजना आकार घेत असल्या तरी त्या पूर्णत्वास न गेल्याने आणि सरासरीच्या तुलनेत अत्यल्प झालेला पाऊस ही कारणे यावर्षीच्या पाणीटंचाईला कारणीभूत ठरत आहेत. मंजूर झालेली धरण दुरूस्ती आणि अपूर्ण पाणीयोजनांची कामे पूर्णत्वास गेली तर पुढील वर्षी चिपळूण तालुका टंचाईमुक्त होईल यात शंकाच नाही.चिपळूण तालुक्यात सरासरी चार ते साडेचार हजार मि.मि. पाऊस कोसळते. मात्र व्यवस्थापन योग्य होत नसल्याने फेब्रुवारी महिना संपला की ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला सुरूवात होतात. आतापर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी यापूर्वी कोट्यावधींचा निधी खर्ची पडला असला तरी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दरवर्षीच अनुभवास येते. यामध्ये धनगरवाड्यांच्या पाण्याचा प्रश्न कायम भेडसावतो. मात्र आता चित्र हळुहळू बदलत आहे. तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावे, वाड्या पाहिल्या तर तेथे बांधलेली धरणे सद्यस्थितीत निकामी झाल्याने त्यांच्यावर टंचाईची वेळ आलेली आहे. www.konkantoday.com