वयाच्या ६५ व्या वर्षी विजयालक्ष्मी देवगोजी यांना पीएचडी
रत्नागिरी : मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या उपाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पीएचडी पदवी संपादन केली आहे.सौ. देवगोजी यांनी ३२ वर्षे डॉ. पत्की यांच्या दवाखान्यात पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी चालविली. ती बंद करून त्यांनी पीएचडीसाठी अथक परिश्रम करून पावणेतीन वर्षांतच विद्यापीठाला आपला प्रबंध सादर केला. सौ. देवगोजी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्य असून त्यांची दोन पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत.मराठी साहित्यातील वडार समाजजीवनाचे चित्रण या विषयात शोधकार्य पूर्ण केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाची पीएचडी पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. डॉ. मनीषा नेसकर त्यांच्या मार्गदर्शिका असून या संशोधनासाठी त्यांना डॉ. विनोद गायकवाड, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. मैजुद्दीन मुत्तवली, डॉ. संजय कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. सौ. देवगोजी मूळ बेळगावच्या असून त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पीएचडी पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.