
शासकीय ठेका घेतला म्हणून झालेल्या वादा मधून मारहाण
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बांधकरवाडी येथील चेतन दिलीप पवार व त्याच्यासोबत असलेला सुनील चव्हाण यांच्यावर रविवारी रात्री शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला केल्याप्रकरणी पवार याच्या तक्रारीवरून संशयित आरोपीं विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेतन पवार हा आपल्या जेसीबी ऑपरेटर सुनील चव्हाण याच्यासह कणकवली बांधकरवाडी जवळ दत्तकृपा निवारा शेड मध्ये रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बसला होता. यावेळी तिथे तीन कारमधून ८ ते १० लोक आले होते. चेतन पवार याने डिसेंबर २०२३ मध्ये देवगड येथील शासकीय कामाचा ठेका भरला होता. त्या ठिकाणी पवार आणि संशयित आरोपी यांच्यात कामाच्या ठेक्यावरुन वाद झाला होता. त्यावेळचा राग मनात ठेवून आरोपी यांनी रविवारी ‘तू देवगड मध्ये येऊन टेंडर का भरतोस ?’ अशी विचारणा पवार याला केली. तसेच शिवीगाळ करीत आरोपीनी स्कॉर्पिओ गाडीतून आणलेल्या लाकडी दांडक्यांनी व दगडाने मारहाण करीत पवार व त्याचा साथीदार यांना गंभीर दुखापत केली. www.konkantoday.com