
रावणाचे उदात्तीकरण थांबवायला हवे – चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : रावणाचे उदात्तीकरण थांबविण्यासाठी हिंदू धर्मातील अधिकारी व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रामकथेवर विवेचन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, रावणाचा पराभव करणाऱ्या रामाचा विजयोत्सव आपण साजरा करतो. त्याच रावणाचे उदात्तीकरण आणि उन्नतीकरण अनेक ठिकाणी सुरू आहे. ते चुकीचे आहे. नाशिकमध्ये तर शूर्पणखेचे मंदिरही आहे. दुष्ट प्रवृत्ती म्हणून त्यांचा नाश रामाने केला असेल, तर त्या दुष्टांचे उदात्तीकरण करणे योग्य नाही. अयोध्येमध्ये नव्याने स्थापन झालेल्या राम मंदिर न्यासाने पुढाकार घेऊन हिंदू धर्मातील अधिकारी व्यक्तींकडून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.रामायणातील विविध प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या रामायणामध्ये संभ्रम दूर करण्याचे कामही झाले पाहिजे, असे सांगून बुवा म्हणाले, वाल्मीकी रामायण सर्वांत प्रमुख आहे. पण तुलसीदास, एकनाथ महाराज अशा इतर अनेक अधिकारी आणि महानीय व्यक्तींनी रामायण लिहिले आहे. दोनशे रामायणे सध्या उपलब्ध आहेत. पण प्रत्येक रामायणात काही प्रसंग वेगवेगळे दिले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रमही हिंदू धर्मातील अधिकारी व्यक्तींनी दूर करण्यासाठी चर्चा करायला हवी.गीतरामायणातील गीतांचे गायन आणि त्यावरील विवेचन अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमात विविध दाखले देत आफळे बुवांनी ओघवत्या शैलीत अनेक मुद्दे मांडले. रामाचा वनवास, सीता आणि ऊर्मिला यांचा त्याग, श्रावणबाळाची कथा, दशरथाचा अविवेक याविषयी त्यांनी विवेचन केले. राम, लक्ष्मण आणि भरत या तीन बंधूंविषयी खूप काही सांगितले जाते. पण शत्रुघ्न हा त्यांचा चौथा भाऊ म्हणजे रामराज्याच्या पायाचा दगड आहे, असेही ते म्हणाले. यावेळी रामाविण राज्यपदी कोण बैसतो, जेथे राघव तेथे सीता, जय गंगे जय भागीरथी, पराधीन आहे जगती ही गीतरामायणातील गीते सादर करण्यात आली. अभिजित पंचभाई यांनी गायन केले. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हरेश केळकर, वज्रांग आफळे (तालवाद्य), सावनी नाटेकर (गायन) यांनी साथ केली.कीर्तनसंध्या परिवारातर्फे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाळ माने तसेच भाजपचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष दादा दळवी यांचा आफळे बुवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.