
कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा अर्ज करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळे यांच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता (पीजी-सीईटी २०२४) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी यापूर्वी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. परंतु ही सीईटी परीक्षा ३१ मे ते २ जून या कालावधीत नियोजित केली आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी २२ मार्चपर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी दिली आहे. या परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी ‘https://www.mcaer.org’ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. देठे यांनी केले आहे.www.konkantoday.com