
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी* *6 ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, : 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पाली येथील डी.जे. सामंत महाविद्यालय, रत्नागिरी एमआयडीसी मधील नवनिर्माण शिक्षण संस्था, कसोप- फणसोप येथील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा आणि संगमेश्वर तालुक्यातील नवनिर्माण शिक्षण संस्था नावडी या 6 ठिकाणी महिला व मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबीराचा मुली व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. या आरोग्य शिबीराच्या नियोजनबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज बैठक घेतली. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी ए.पी.जाधव, रविंद्र सामंत आदी उपस्थित होते. शिबीरामध्ये इसीजी, सर्व रक्त तपासण्या, अस्थिरोग तज्ञ, तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, स्त्री रोग तज्ञ तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे देण्यात येणार आहे. जनरल सर्जरी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा याबाबतही तपासणी व उपचार होणार आहेत. प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट रत्नागिरीत पहिल्यांदाच आणले जात आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे. या शिबीरासाठी येणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था, महिलांसाठी पाण्याची व्यवस्था, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. www.konkantoday.com