रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरामध्ये दुचाकी, चारचाकी गाड्या बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांना नव्या जिल्हा शल्यचिकित्सकांचा दणका
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचे रुग्णालय आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या टोकापासून वेगवेगळ्या उपचारासाठी रुग्ण दाखल होतात. दिवसभराची सुमारे ५०० च्यावर बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते. साथीच्या दिवसात तर त्याची संख्या साडेसात ते आठशेच्या दरम्यान असते. परंतु या रुग्णालयातील रिकाम्या जागेचा अनेक वाहनधारक गैरफायदा घेत असल्याचे नुतन जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांच्या निदर्शनास आले. काही बाहेरचे लोक आपली गाडी पार्किंग करून निघून जातात ते संध्याकाळी उशिरा येतात. यामुळे रुग्णालय परिसरामध्ये अनेक दुचाकी, चारचाकी गाड्या बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दिसत होत्या. काही दिवसांपूर्वी या बेशिस्त वाहतुकीचा फटका एका रुग्णाला बसला. एवढी वाहतूक कोंडी झाली की रुग्णावाहिकाच आतमध्ये जाण्यासाठी जागा नव्हती. अखेर रुग्णाला स्ट्रेचेरवरून बाहेरूनच आणावे लागले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी हे सर्व पाहिल्यानंतर त्यांनी पार्किंगबाबत ठोस निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी येणारीच वाहने आणली जाती. तसेच ती वाहने पंधरा मिनिटे ते अर्धातास थांबवली आणि त्यानंतर ती तेथून काढली जातील, अशा सूचना सुरक्षा गार्डना देऊन ठेवल्या आहेत. यामुळे वाहन पार्किंग करून ठेवणाऱ्यांना दणका बसला आहे. तसेच रुग्ण ने-आण करण्यासाठीही रस्ता मोकळा झाल्यामुळे रुग्णवाहिकांना देखील मार्ग मोकळा झाला आहे. www.konkantoday.com