
राजापूर विधानसभा मतदार संघात काही लोकाचा भावनिक राजकारण करून आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न -अजित यशवंतराव
सध्या संपूर्ण राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना राजापूर विधानसभा मतदार संघात काही लोक भावनिक राजकारण करून आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. भावनिक राजकारण करून आपल्या मतांची बेगमी करण्याची केविलवाणी धडपड काहींकडून सुरू असून राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघातील जनतेने अशा भावनिक आणि स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी केले आहे.राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत. आरोग्य विभागाच्या बाबतीत तर खूपच समस्या आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नाहीत, अन्य सेवा सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे इथल्या रुग्णांना रत्नागिरी अथवा मुंबई, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. ग्रामीण भागातील रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, पाणी योजना आदी विभागात देखील खूप समस्या आहेत. या विधानसभा मतदारसंघात कुठले चांगले प्रकल्प, उद्योग न आल्याने बेरोजगारीची समस्या आहे. इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी मुंबई कडे जावे लागत आहे. मतदारसंघात अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. फार्मसी विद्यालय नाही. अशा प्रकारची व्यावसिक अभ्यासक्रम सुरू झाले तर त्याचा फायदा इथल्या तरुणांना होणार आहे. मात्र या सगळ्या प्रश्नांकडे इतके वर्ष दुर्लक्षच होत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे विकासाच्या बाबतीत हा मतदार संघ पिछाडीवर राहिल्याचे यशवंतराव यांनी नमुद केले आहे.
www.konkantoday.com