*रत्नागिरीजिल्ह्यात जलजीवनच्या चौकशीसाठी स्पेशल स्कॉड*
____जलजीवन मिशन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाणी योजनांची कामे हा केवळ दिखावा असून २५ टक्केसुद्धा काम झाले नसल्याची गंभीर बाब आमदार जाधव यांनी ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत समोर आणली. त्यानंतर महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित सैनी यांनीही ही बाब खरी असल्याचे मान्य केल्यानंतर मंत्री पाटील यांनी तत्काळ स्पेशल स्कॉड पाठवून जिल्ह्यातील सर्व कामांची तपासणी, सखोल चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले.जलजीवन मिशन योजनेतील कामांचा उडालेला बोजवारा व जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा वेळेत तयार न झाल्याबाबत विधानसभेत विचारलेल्या तारांकीत प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत ज्यांची बाजारात ५०० रुपयांचे साहित्य खरेदी करण्याची पत नाही अशा एकेका ठेकेदाराने शंभर शंभर कोटींची कामे घेवून ठेवली आहेत. ते कामे करत नाही. जिथे कामे झाली आहेत, त्यांना बिलकुल दर्जा नाही आणि याला जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार आणि कार्यकारी अभियंता मयुरी पाटील आहे. या दोघांचा जिल्ह्यात संपर्क नाही. ते कुठल्याही कामाच्या ठिकाणी जात नाहीत आणि दर्जाहिन कामाकडे दुर्लक्ष करात. ठेकेदारांशी साटेलोटे असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा बोजवारा उडाला असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी बैठकीत केला. www.konkantoday.com