
कोकण किनारपट्टीवरील प्रदूषण धोकादायक पातळीवर, रसायनांमुळे सागरी आणि मानवी आरोग्य धोक्यात
राज्याला लाभलेली ७२० किलोमीटरची कोकण किनारपट्टी प्रदूषणामुळे धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे संशोधनातून समोर आले आहे. किनारपट्टी प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये सूक्ष्म प्लॅस्टिक, औषधांतील रासायनिक घटकांचा समावेश असून, या प्रदूषणामुळे सागरी जीवन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
प्राग येथील चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस आणि मुंबईतील महाराष्ट्र महाविद्यालय यांनी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदूषणाबाबत संशोधन केले. या संशोधनाबाबतचा शोधनिबंध ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंट’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला. प्रदीप कुमकर, चांदनी वर्मा, प्रा. लुकाश कालोस, डॉ. सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखालील संशोधकांच्या चमूमध्ये स्टेफान हायसेक, मनोज पिसे, सोनिया झाल्टोवस्का, फिलिप मर्कल, मातेय बोझिक, लुकास प्रौस, कतरिना हँकोव्हा, राडेक रिन, पावेल कलौचक, मिस्लोव पेट्रटिल यांचा समावेश होता.
संशोधनासाठी मुंबई ते वेंगुर्ला या भागातील किनारपट्टीची दक्षिण, मध्य आणि उत्तर अशी विभागणी करून त्यातील १७ ठिकाणी सखोल अभ्यास करण्यात आला. त्यात औद्याोगिक ठिकाणे, मासेमारी बंदरे, लोकप्रिय पर्यटनस्थळे यांचा समावेश होता. या १७ पैकी १५ ठिकाणी सूक्ष्म प्लॅस्टिकचे अस्तित्व आढळून आले. त्यात उत्तर कोकण किनारपट्टी सूक्ष्म प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचे दिसून आले. या सूक्ष्म प्लॅस्टिक धोकादायक घटकांचे वाहक असल्याने पर्यावरणीय, तसेच आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय मेटोप्रोलोल, ट्रामाडोल, वेन्लाफॅक्सिन, ट्रायक्लोसन, बिस्फोनेल ए, बिस्फोनेल एस असे रासायनिक घटक किनारपट्टीवरील पाण्यात आढळून आले. हे रासायनिक घटक औषधे, तसेच दैनंदिन वापरातल्या वस्तूंमध्ये असतात. उच्च रक्तदाबावरील उपचारांमध्ये मेटोप्रोलोल, वेदनाशामक औषधांमध्ये ट्रामाडोल, तर मानसोपचारातील औषधांमध्ये वेलानफॅक्सिन हा घटक वापरला जातो. या रासायनिक घटकांमुळे सागरी जीवन, मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या संशोधनात मासे, शैवाल, कोळंबी, खेकडे यांची तपासणी करून पर्यावरणाला निर्माण होणारा धोकाही अभ्यासण्यात आला. त्यात ७० टक्क्यांहून अधिक ठिकाणांना उच्च ते मध्यम पर्यावरणीय धोका असल्याचे आढळले. ही बाब गंभीर आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे.
www.konkantoday.com