जंजिरा किल्ला प्रतिकृती.! मालगुंडकर परिवाराने साकारला किल्ला!
दिवाळी आणि किल्ला हे समीकरण होऊन गेले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे दिव्य स्मरण आपल्याला होते. यंदा माझ्या मुलांनी जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला.
दिवाळी आली आहे, तर आपण किल्ला साकारूया, असे मला मुलांनी सांगितले. मी त्यांना त्याच उत्साहाने होकार देत त्यांना प्रोत्साहन दिले. आपल्या मुलांना आपणच प्रोत्साहन द्यायला हवे, तरच त्यांच्यात आपल्या संस्कृती, संस्कारांविषयी आवड निर्माण होणार. मुलांनी
किल्ला साकारायला घेतला आणि लक्षात आले, की शिक्षण फक्त कागदोपत्रीच उपयोगाचे नाही; तर दगडी मातीमध्ये हात मिसळून आपल्या मातीशी प्रेम करणे म्हणजेही एक प्रकारे शिक्षण घेणे आहे.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन करण्याचे विचारात आणले, त्यावेळेला प्रत्येक किल्ल्याची निर्मिती करताना त्यांना भंडारी समाजाचा मोठा हातभार लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख भंडारीच होते. आपल्या समाजाविषयी अभिमानास्पद ही गोष्ट मुलांना माहिती करून देणे मी माझे आद्य कर्तव्य समजतो.
यंदा जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचं ठरवलं आणि माझ्या मुलांनी उत्साहाने किल्ला साकारण्याचे मनावर घेतले. अगदी तटबंदी, बुरुज आणि तोफा हे त्यांनी स्वतःच्या हाताने निर्माण केले. दगड, माती आणण्यापासून सर्व गोष्टी त्यांनी आवडीने केल्या. किल्ला बांधल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जणू एखादा गड जिंकल्यासारखा होता. किल्ला साकारायला आमच्या सोसायटीतील मुलांनीही हातभार लावला.
किल्ला साकारताना एक मात्र जाणवले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा विसर ना आजच्या पिढीला पडलाय आणि भविष्यात ना कुणाला पडणार.
|| जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय ||
आमच्या किल्ला उभारणीच्या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही या भरपूर प्रतिसाद द्या, प्रोत्साहन द्या! धन्यवाद!
◆ ठिकाण : सुरेश स्मृती अपार्टमेंट, टिळक आळी- रत्नागिरी
ज्यांनी हा किल्ला घडवला ते
( श्रावणी मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, सार्थक चव्हाण, यश मयेकर )
– फोटोग्राफर कांचन मालगुंडकर (कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ, रत्नागिरी)
www.konkantoday.com