पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात ढगाळ वातावरण,तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता
ऑक्टोबर उष्मा, हवामान बदलामुळे होणारी संसर्गजन्य सर्दी यामुळे जनता हैराण झाली असतानाच गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. या हवामान बदलाला आता ढगाळ हवामानाची साथ मिळणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यांनी काही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे.
खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका आहे, तर काही भागात थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मात्र पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे, तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवारी ९ पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होऊन दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता आहे. तिथे पावसाची शक्यता नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता तर आहेच, पण कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊ शकते. यामुळे काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
www.konkantoday.com