महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात नर्सिंग कॉलेजला परवानगी
महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात आता नर्सिंग कॉलेजला परवानगी मिळाली आहे. यंदापासून एएनएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरवात झाली आहे. कर्वे संस्थेचे हे राज्यातील तिसरे नर्सिंग कॉलेज ठरणार आहे.या कॉलेजला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र परिचर्या परिषदेची मान्यता असून नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत व स्वतंत्र वसतिगृहाची सोय आहे. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी २८ नोव्हेंबर अंतिम तारीख असल्याची माहिती रत्नागिरी प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महर्षी कर्वे संस्थेच्या या कॉलेजमध्ये प्रशस्त वर्गखोल्या व अत्याधुनिक प्रात्यक्षिक वर्ग आहेत. विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध आहे तसेच ४०० पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. या कोर्ससाठी विद्यार्थिनींना बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एएनएम कोर्स २ वर्षांचा आहे. विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक अनुभवासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, चिंतामणी हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, शहर व ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्यकेंद्रात पाठवण्यात येणार आहे.
कोरोना महामारीनंतर कौशल्य विकसन कार्यक्रमाअंतर्गत महर्षी कर्वे संस्थेने शिरगाव येथे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली असून, येथे कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, सदस्य प्रसन्न दामले, संपदा जोशी, नर्सिंग कॉलेजच्या प्र. प्राचार्य अर्चना बाईत, क्लिनिकल असिस्टंट गौरी भंडारी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com