पंपाच्या बिघाडामुळे खेडचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा अखेर पूर्वपदावर
खेड शहराला पाणीपुरवठा करणार्या दोन पंपांमध्ये झालेल्या बिघाडाने विस्कळीत पाणीपुरवठा अखेर पूर्ववत झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र कमी दाबाच्या पाण्याची समस्या कायम आहे. पंप बिघडल्यानंतर गेले ३ दिवस नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंग सुरू होती. नगर प्रशासनाच्या नियोजनाअभावी नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान शमवावी लागली होती.
भरणे येथील जॅकवेलमधून शहरातील नगर परिषदेच्या साठवण टाकीमध्ये पाणी आणले जाते. या टाक्या भरल्यानंतर शहराला पाणीपुरवठा केला जातो. यापूर्वी भरणे जॅकवेल येथील फुटलेल्या जलवाहिनीमुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होवून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर होवून काही दिवसांचा अवधी लोटताच पाणी खेचण्यासाठी आवश्यक असणारा पंप जळाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर नगर प्रशासनाने टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकरद्वार सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने त्या भागातील नागरिकांची पाण्यावाचून हाल सुरू होते. यामुळे नागरिकांवर विकतचे पाणी घेवून तहान शमविण्याची नामुष्की ओढवली होती.
www.konkantoday.com