माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
रत्नागिरी (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आरोग्य दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभागाच्या वतीने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांना सन २०२३ चा जाहीर झालेला मानाचा राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक पुरस्कार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात संपन्न झालेल्या या समारंभाला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस माननीय हेमंत टकले, राज्याच्या मानवाधिकार आयोग व एस सी सी टी आयोगाचे माजी अध्यक्ष श्री सी एल थूल, यशवंतराव चव्हाण सेंटरचे संयोजक श्री. विजय कान्हेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, विभाग प्रमुख श्रीमती दीपिका शेरखाने उपस्थित होते.
डॉक्टर कद्रेकर यांनी वयाच्या 94 व्या वर्षी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करून ज्येष्ठ नागरिक पुरस्काराचा सन्मान प्राप्त केला ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद करीत मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. डॉक्टर कद्रेकर यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या. डॉक्टर कद्रेकर यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीचिन्ह, यशवंतराव चव्हाण जीवन प्रवाह फोटो अल्बम आणि रोख रक्कम, असे आहे. डॉक्टर कद्रेकर यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
www.konkantoday.com