कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टॅन्ड काढण्यावरून मोठा राडा
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा झाला आहे. खासगी दुकानदारांनी लावलेल्या चप्पलस्टँड कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढल्यावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चप्पलस्टँड सुविधा करण्यात आल्यानंतर मंदिराच्या भिंतीलाच खेटून असलेल्या दुकानांवर मंगळवारी सकाळी कारवाई करण्यात आली. खासगी दुकानदारांनी महापालिकेच्या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर आवारात भाविकांना चप्पल घालून प्रवेश बंद केल्यानंतर खासगी ठेका देऊन मंदिराच्या प्रवेश द्वारा बाहेरच खासगी चप्पल स्टँड लावण्यात आले होते. खासगी ठेका चालवणारे मनमानी करत असल्याने काही दिवसांपूर्वी खासगी चप्पलस्टँड बंद करून देवस्थान समितीने स्वतः चप्पलस्टँड उभारून त्याचे गेल्याच महिन्यात तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन केले होते.खासगी चप्पल स्टँड चालकांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी आहे. मात्र, त्या आधीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळी 10 वाजेच्या सुमारास खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड जेसीबीच्या मदतीने हटविण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या कारवाईला दुकानदारांनी जोरदार विरोध करत चप्पल स्टँड चालक महिलांनी आक्रोश केला. मात्र, अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की करत चप्पलस्टँड हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या खासगी दुकानदारांनी लावलेल चप्पलस्टँड मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले. यावेळी महिला दुकानदार आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
www.konkantoday.com