हर्णै बंदरात मच्छि लिलाव सुरू, पुन्हा एकदा हर्णै बंदर गजबजले
हर्णैतील गणेशोत्सवासाठी बंद ठेवण्यात आलेल्या मासेमारीला वादळी पावसामुळे आणखी उशिरा सुरूवात झाली. त्यामुळे गेले १५ दिवस हर्णै बंदरातील लाखोंची उलाढाल ठप्प होती. मात्र वादळी वातावरण शांत झाल्यानंतर लगेचच मासेमारीसाठी बोटी रवाना झाल्या होत्या त्यापैकी काही नौकांनी आज सकाळी हर्णै बंदरात मासळी उतरवल्यामुळे पुन्हा एकदा हर्णै बंदर गजबजल्याचे दिसून आले आहे.
हर्णै बंदर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर असून येथे कोळंबी, म्हाकुळ, सुरमई, बांगडा, बगा आदी मासळी मिळतात. यातील बहुतांश मासळी पुणे, मुंबई, गोवा, बेंगलोर आदी ठिकाणी कंपनीत पाठविली जाते. बंदरात रोज सकाळ संध्याकाळ मासळी लिलाव होत असतात. खुली लिलाव पद्धती असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटकही थेट मासळी खरेदीसाठी येतात. त्यामुळे हर्णै बंदरात रोज लाखोंची उलाढाल होत असते. पुन्हा मासळीची आवक पुन्हा सुरू झाल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले डिझेल विक्रेते, किराणा, जाळी उद्योगासह वडापाव, चहाच्या गाड्या, भाजी मार्केट आदी उद्योगांनीही जोरदार हजेरी लावलेली दिसून आली. गेले १५ दिवस बंद राहिलेले मच्छि सेंटर मासळी खरेदीसाठी सज्ज झालेले होते.
www.konkantoday.com