कोरोनानंतर २७६३ जणांची नैराश्यातून आत्महत्या!
कोरोना काळात शाळा-महाविद्यालये बंद राहिल्याने मुलांना मित्रांचा सहवास मिळाला नाही, मैदानी खेळही बंद राहिले. अनेकांना व्यवसायात नुकसान झाले व कर्जबाजारीपणा वाढला, रोजगार गेला, आई-वडिल दोघेही जॉबला व मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यातून दोघांमधील सुसंवाद कमी झाला, अशा कारणांतून एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२३ या काळात नैराश्यातून राज्यातील तब्बल दोन हजार ७६३ जणांनी जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक बाब राज्याच्या मानसिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.राज्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. कोरोनातून बाहेर पडताना अनेकांना जगणे मुश्किल झाले असून ताणतणाव, नैराश्यात वाढ झाली आहे, विशेषत: तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘मनशक्ती केंद्र’ बनवून त्याठिकाणी अशा लोकांचे मेडिटेशन, प्राणायाम, योगाच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. दुसरीकडे ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर या प्रादेशिक मनोरुग्णालयाशिवाय कोल्हापूर व जालन्यातही प्रादेशिक मनोरुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दहा खाटा खास मनोरुग्णांसाठी राखीव ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये योगा शिक्षकाची नेमणूक करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच जालना, कोल्हापूर, ठाणे येथील मनोरुग्णालयाचा विस्तार करण्याचाही निर्णय झाला आहे.
www.konkantoday.com