
बाणखिंड येथे अंमली पदार्थ बाळगणार्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी शहरातील परटवणे ते गणपतीपुळेकडे जाणार्या रस्त्यावरील बाणखिंड येथे अंमली पदार्थ बाळगणार्या दोघांच्या शहर पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून १२६ ग्रॅम अंमली पदार्थ, रोख रक्कम, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण १ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मंगळवारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हुजेफा अब्दुल हमिद साखरकर (३५), मुसेब अब्दुल हमीद साखरकर (३३, रा. दोन्ही रहेमत मोहल्ला, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.
शहरालगतच्या बाणखिंड येथे अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री शहर पोलिसांकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता हुजेफाकडून ८ ग्रॅम तर मुसेबकडून १८८ ग्रॅम अंमली पदार्थांच्या एकूण १६८ कागदी पुड्या मिळून आल्या. दोन्ही संशयितांविरूद्ध एन.डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com