डॉक्टर्स येतात का… औषधं आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना…जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली शासकीय रुग्णालयाची पाहणी
*रत्नागिरी, दि. ३ : ‘डॉक्टर्स येऊन तपासता का… औषधं उपलब्ध आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना…’ असे प्रश्न रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स आणि परिचारिकांना साक्षात जिल्हाधिकारी विचारत होते. *जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली शिवाय रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांच्याशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी रुग्णालयातील एनआयसीयु, एनआरएचएम, प्रशासकीय विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन, पीसीपीएनडीटी विधी समुपदेशक दालन, स्त्री रुग्ण विभाग, पुरुष रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, भौतिक उपचार, डीईआयसी, फिजीओथेरेपी विभागांची पाहणी करुन माहिती घेतली.
रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत उपचाराबाबत विचारपूस केली. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आणि सेवेवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांशीही, पुरेशी औषध उपलब्ध आहेत का.. अशी विचारणा करुन नसतील तर जी लागणार आहेत त्याबाबत खरेदीचा प्रस्ताव द्या, असे सांगून त्यांनी दाखल रुग्णांचीही माहिती घेतली. यावेळी उपस्थित परिचारिकांशी संवाद साधून, एकीलाचा ड्युटी लावली जाते का..वेळेपेक्षा जादा तर ड्युटी लावली जात नाही ना..अशी विचारपूस केली. काही अडचण असल्यास पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याबाबतही त्यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत विशेषत: स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेविषयी त्यांनी विचारणा केली.
यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, सहा महिन्यापूर्वी मी भेट दिली होती. त्यावेळी पेक्षा आजच्या भेटीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये खूप सुधारणा झाल्याचे मला आढळून आले. रुग्णालयामध्ये सर्वत्र साफसफाई दिसून आली. उपचारदेखील चांगले केले जात आहेत. त्याबाबत रुग्ण, नातेवाईक यांनीही समाधान व्यक्त केले. स्टाफ आणि रिक्त जागांबाबत शासनस्तरावर मागणी करुन पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com