नद्या गाळमुक्त करण्याच्या यादीतून शिवनदी गायब

0
42

चिपळूण शहरात पूर आल्यास शिवनदीमुळे अर्धे शहर बाधित होते, असे असताना शासनाने गाळ काढण्याच्या जाहीर केलेल्या राज्यातील नद्यांच्या यादीतून हीच नदी गायब झाली आहे. त्यामुळे नद्या गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी व चिपळूण बचाव समिती नेमके काय करतात, असा सवाल उपस्थित होत आहे. या नदीतील गाळ काढण्यासाठी निधी न आल्यास लाल व निळी पूररेषा जाईल की नाही अशी भीतीही नागरिकांना वाटू लागली आहे.
शहरातून शिवनदी व वाशिष्टी नदी वाहते. गेल्या अनेक वर्षापासून या नद्यांमधील गाळ न काढल्याने जुलै २०२१ साली येथे महापूर आला. यामुळे मोठे नुकसान झाले. शहर तर अनेक वर्षे मागे गेले. त्यामुळे लोकप्रतिनिधी व चिपळूण बचाव समितीने या दोन्ही नद्या गाळमुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला. त्यानंतर शासनाला जाग आली आणि गेल्या दोन वर्षापासून नद्यांमधील गाळ काढला जात आहे. त्यामुळे शहरात येणार्‍या पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. खुद्द शासनाचेच नुकसान टाळण्यासाठी राज्यातील १४२ नद्यांमधील गाळ काढण्याची तरतूद केली आहे.
त्यानुसार २५ जुलै  २०२३ रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यात येथील लोकप्रतिनिधी व चिपळूण बचाव समिती यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यास शासन मंजुरी देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र याच परिपत्रकाला जोडलेल्या नद्यांच्या यादीत वाशिष्ठी वगळता शिवनदीचा उल्लेख नाही. वाशिष्ठी नदीमुळे शहराचा जितका भाग बाधित होत नाही त्यापेक्षा अधिक भाग शिवनदीला येणार्‍या पुरामुळे बाधित होतो. त्यामुळे याच नदीचा यादीत समावेश नसल्याने नागरिकांना धडक भरली आहे. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here