शिवसेना आमदार अपात्रतेची आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार

0
64

मुंबई- शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी आज विधानसभेत पार पडली. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी दोन्ही बाजूने आपला युक्तिवाद केला. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला.

शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सर्व याचिका एकत्र नको, वेगवेगळी सुनावणी घ्या, असा युक्तिवाद यावेळी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सगळ्या याचिका एकत्रित चालवाव्या या शिवसेना ठाकरे गटाच्या मागणीवर अँड. देवदत्त कामत, असिम सरोदे, रोहित शर्मा यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर एकनाथ शिंदे गटातर्फे अँड. अनिलसिंग यांनी प्रचंड विरोध केला. प्रत्येक याचिका स्वतंत्र चालवावी आणि आम्हाला आवश्यक वाटेल तर नैसर्गिक न्याय तत्वानुसार पुरावा घेण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सगळ्या वकिलांना सुचवणार आणि त्यावर सगळ्यांची मते घेणार आहेत.

सर्व वकिलांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीचे वेळापत्रक देण्यात येणार आहे. सुनावणीआधी मुद्दे ठरवावे लागणार, असे अध्यक्षांनी म्हणताच ठाकरे गटातर्फे यावर आक्षेप घेण्यात आला. असं आधी कधीच झालं नाही, असं ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलं. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल यावर्षी लागणे कठीण आहे. कारण या प्रकरणात ठाकरे गटाच्या 22 तर शिंदे गटाच्या 12 अशा एकूण 34 याचिका आहेत. सर्व याचिकांवर स्वतंत्र युक्तिवाद होणार आहे. संभाव्य वेळापत्रकात कागदपत्रे तपासणी, साक्ष नोंदवणे व उलट तपासणी यांचा समावेश आहे. संबंधित प्रकियेला किमान ३ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्याने सुनावणीची शक्यता कमी आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here