नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन’चे सुवर्णसुर्य फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये आयोजन
कोकणात यावं, कोकणची माती, कोकणची माणसं, कोकणच्या प्रथा, कोकणची नाती आणि कोकणचं सौंदर्य अनुभवाव या सुहेतून नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन’चे सुवर्णसुर्य फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये आयोजन केले जात आहे.ही मॅरेथॉन भारतातल्या टॉप टेन मॅरेथॉन मध्ये समाविष्ट व्हावी या इर्षेने रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन देखील या मॅरेथॉनच्या नियोजनामध्ये पूर्णपणे सहभागी झाली आहे. कोकणातील सर्वात मोठा रत्नागिरी सायकलिस्ट क्लब या मॅरेथॉनच्या प्रचार प्रसारात मोलाचा वाटा उचलत आहेत.
21 किमी, 10 किमी आणि 5 किमी असे या मॅरेथॉनच स्वरूप असेल. मारुती मंदिर इथून सुरू होणाऱ्या या उपक्रमाची भाट्ये समुद्रकिनारा येथे सांगता होईल. रत्नागिरी, नाचणे, काजीरभाटी, पोमेंडी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे फणसोप आणि भाट्ये या गावांमधून खाडी किनाऱ्यावरून समुद्राकडे जाणारा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला भूप्रदेश 21 किमीसाठी निवडण्यात आला आहे. ‘धावनगरी रत्नागिरी’ अशी ओळख मिळून संपूर्ण कोकण आणि प्रामुख्याने रत्नागिरी जिल्हा ‘फिटनेस टुरिझम’ साठी संपूर्ण जगाला सुपरिचित व्हावा हे फाउंडेशनच ध्येय आहे. आणि त्या दृष्टीने मुंबई, पुणे, सातारा, गोवा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर या तुलनेत रत्नागिरीजवळ असणाऱ्या विभागातील धावपटूंशी संपर्क केला जात आहे. या विभागातील अनेक धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी रजिस्टर करायला सुरुवात केली आहे. चिपळूण येथील आयर्न मॅन तेजानंद गणपत्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नऊवारी साडी नेसून 42 किमी धावण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे त्या रत्नागिरीच्या क्रांती साळवी, मुंबई येथील प्रसिद्ध धावपटू अनिल कोरवी, वर्षा थेटे, लक्ष्मी झा, बरून संत्रा, रीना सैनी, मिलनार सेन, लिली चौहान तसेच विटा येथील प्रसिद्ध धावपटू ट्रायथलिस्ट संग्राम कचरे, सांगली येथील S3 अकॅडमीचे संतोष शिंदे, पुणे येथील सौ. विभावरी सप्रे यांनी आपापल्या विभागांमध्ये या मॅरेथॉन विषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
जे रत्नागिरीकर या ‘धावनगरी रत्नागिरी’ मोहिमेत रजिस्टर करणार आहेत त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून कोकण कोस्टल मॅरेथॉन ट्रेनिंग प्रोग्राम लॉन्च केला जाणार आहे. मॅरेथॉनला रजिस्टर केलेल्या प्रत्येकासाठी हा ट्रेकिंग प्रोग्राम नि:शुल्क असेल. 14 रविवारच्या या ट्रेनिंग प्रोग्रामनंतर वर्ष 2024 च्या पहिल्या रविवारी रत्नागिरीतील सहभागी धावपटूंनी ठरवलेलं अंतर लीलया पार करावं हा या मागचा उद्देश आहे. रन फॉर एज्युकेशन या हॅशटॅग अंतर्गत हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रत्येकी 10 धावपटूमागे एक विज्ञान तंत्रज्ञानाशी निगडित पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळांना वितरित केले जाणार आहे .ओपन वयोगटा व्यतिरिक्त 36 ते 45, 46 ते 55, 56 ते 65 + वयोगटानुरूप सुमारे दोन लाखाची बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
रत्नागिरीकरांनी संपूर्ण जगासाठी आयोजित करायचं ठरवलेल्या या उपक्रमाला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सहकार्य करण्याचा आश्वासन दिल असल्याचं आयोजकांनी सांगितलं. आत्तापर्यंत वय वर्षे 14 ते वय वर्ष 70 इतक्या अबालवृद्धांनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे. देऊळ, कातळ शिल्प, हेदवी ते गणपतीपुळे, संगमेश्वर मधील देवळे गाव इत्यादी ठिकाणी सायकलीस्ट नेऊन फाउंडेशनने रत्नागिरी जिल्ह्याला जगाच्या नकाशावर क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच पुढचं पाऊल म्हणजे कोकण कोस्टल मॅरेथॉन आहे, असं फाउंडेशनच्या प्रसाद देवस्थळी यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेला अथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, रत्नागिरी सायकलीस्ट क्लबचे धीरज पाटकर, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, मैत्री ग्रुप ऑफ बिझनेसचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूर देसाई हे उपस्थित होते.
www.konkantoday.com