देवेंद्र फडणवीस यांनी लाठीहल्ल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा-डबेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर
वारकरी आणि मराठा समाजावर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा आम्ही तीव्र शब्दांत धिक्कार करतो. मात्र, गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्या देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील लाठीहल्ल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबईतील डबेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आज दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्यात जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या दादर भागात मराठा समाजाच्या वतीने रविवारी (ता. ३ सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले. यात मुंबईतील डबेवालेही सहभागी झाले होते. सरकार आणि पोलिसांचा निषेध या आंदोलनाच्या माध्यातून करण्यात येत आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा इशाराही आंदोलकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.
तळेकर म्हणाले की, जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरू होतं. पण त्याच्यावर लाठीहल्ला, आश्रुधूर सोडण्यात आला आणि गोळीबारही करण्यात आला. मागे आळंदीत वारकऱ्यांवर लाठीहल्ला केला, त्यावेळी वारकऱ्यांनी दगडफेक केली नव्हती, तरीही वारकऱ्यांवर हल्ला झाला. आताही जालन्यात पाहिली दगडफेक झाली नव्हती, पहिला लाठीहल्ला झाला, त्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटली असेल. या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो. वारकरी आणि मराठा समाजावर लाठीहल्ला करता. गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्यांनी याची जबाबदारी घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
डबेवाला म्हणून आम्ही मुंबईत काम करत असलो तरी आम्ही मावळ भागातून आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही मावळे आहोत, आम्ही मराठा आहोत. आरक्षणाची गरजही आम्हाला आहे. आमच्या आजोबांनी, वडिलांनी आणि आम्हीही डबेवाले म्हणूनच काम करत आहोत. आमच्या मुलांनी डबे वाहू नयेत, असं आम्हाला वाटतं. आरक्षण मिळालं तर आमची मुलं शिकतील. त्यांनाही पुढं नोकऱ्या लागतील. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही मुंबईच्या डबेवाल्याचीही मागणी आहे, असे तळेकर यांनी स्पष्ट केले.
,www.konkantoday.com