रत्नागिरी शहरातील सलोख्याचे वातावरण बिघडवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव
रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये एकाच ठिकाणी राहून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस आता अॅक्शन मोडवर आले आहेत.शहरातील काही भागात अंमली पदार्थ सापडत असून अंतर्गंत वादांमुळे परिसरातील वातावरण गढूळ होत आहे. याला चाप लावण्यासाठी शहरातील ९ जणांविरोधात शहर पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्या प्रस्तावांवर प्रांताधिकाऱ्यांकडे लवकरच सुनावणी होणार आहे.
रत्नागिरी शहर व परिसरातील काही भागांमध्ये मागील दीड-दोन महिन्यात छोट्या-मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी अंमली पदार्थ सापडले होते. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेऊन अनेकांना जेरबंद केले. अंमली पदार्थांचे रॅकेट शहरामधून उद्ध्वस्त करण्यात पोलिस यंत्रणेला काही प्रमाणात यश आले आहे. यामध्ये सापडलेल्या काही जणांविरोधात त्यांच्यावरील पूर्वीचे गुन्हे लक्षात घेऊन हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. शहरात काही नागरिकांवर आपापसात वाद घडवून आणल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यात काही महिलांचाही समावेश आहे. मारामारीचे गुन्हेही दाखल झालेले आहेत. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे शहरातील सलोख्याचे वातावरण बिघडत असल्याने पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. रत्नागिरी तालुक्यात एकूण ९ जणांविरोधात अशी कार्यवाही प्रस्तावीत केली आहे. त्यामध्ये रिहाना उर्फ रेहाना उर्फ रिजवाना गफार पकाली, ओंकार मोरे, हेमंत भास्कर पाटील, सरफराज उर्फ बॉक्सर अहमद शहा, स्वप्नील बाळू पाचकडे, सलमान नाझीम पावसकर, फहीम अहमद नूरमहमंद खडकवाले, अमिर मुजावर, अमेय मसुरकर यांचा समावेश आहे. शांतता व सलोखा कायम राहावा यासाठी पोलिसयंत्रणेकडून या व्यक्ती हद्दपार व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यातील काहीजण अंमलीपदार्थ विक्री प्रकरणात आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाल्यासअंमलीपदार्थ विक्रीला पायबंद बसेल, असे पोलिसांचे मत आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे लवकरच सुनावणी होणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com