राजापूर येथे वृध्द मातेवर जबरदस्ती करणार्या मुलाला१० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
तीन वर्षांपूर्वी राजापूर येथे वृध्द मातेवर जबरदस्ती करणार्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. संजय विष्णू मिरगुले (रा.साखर कोंबे, राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
पीडितेचे दोन मोठे मुलगे विजय आणि दिपक नोकरीनिमित्त मुंबईला असतात. त्यावेळी कोरोना काळ असल्याने तिचा दुसरा मुलगा दीपक हा पत्नी दिपालीसह राजापूरला घरी आला होता. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने त्याला पत्नीसह १४ दिवस शेजारी राहणार्या अनंत मिरगुले यांच्या घरात कॉरनटाईन करण्यात आले होते. दरम्यान ११ जून २०२० रोजी रात्री १० च्या सुमारास पीडिता आणि तिचा लहान मुलगा संजय हे दोघेच जेवण करुन झोपी गेले होते. यावेळी रात्री आणि पहाटे संजयने पीडितेवर जबरदस्ती केली.
या घटनेची माहिती पीडितेने दुसरा मुलगा दिपकला दिली. त्यावर संजयने ही गोष्ट कोणाला सांगितली, तर सर्वांना ठार मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला होता. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात संजय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप काळे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. वर्षा प्रभू यांनी १६ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी आरोपी संजयला १० वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
www.konkantoday.com