मुंबई इलाख्याचे नि:स्पृह, सज्जन, सुसंस्कृत मुख्यमंत्री बाळासाहेब खेर- ॲड. विलास पाटणे
रत्नागिरीच्या टिळक आळीत जन्मलेले मुंबई इलाख्याचे पाहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. नि:स्पृहतेमुळे त्यांच्यासाठी पद हे नेहमीच साधन म्हणून राहिले. बाळासाहेबांकडे पदे चालून आली. आपल्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाने त्यांनी त्या पदांना उंची प्राप्त करून दिली. त्यांची विविध पदांवर झालेली निवड ही भारतीय लोकशाहीची मानदंड आहेत. ते विचाराने, आचाराने आणि कृतीने राष्ट्रीय नेते होते, असे प्रतिपादन अॅड. विलास पाटणे यांनी केले. रविवारी सायंकाळी कै. खेर यांच्या जयंतीनिमित्त यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. पाटणे बोलत होते.
सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, यांच्यासह व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, प्रा. जयश्री बर्वे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अॅड. पाटणे म्हणाले की, आता स्पर्धेच्या युगात परीक्षा व अन्य मार्गदर्शन करणारी प्रशासकीय इन्स्टिट्यूट काढावी. त्यासाठी शासन नक्की मदत करेल. १९२२ साली बाळासाहेब खेर यांच्या सविनय कायदेभंग आणि ‘भारत छोडो’ या आंदोलनातील कारावास आणि समाजकार्य यांची दखल काँग्रेसने घेतली. त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाची छाप गांधीजींवर पडली होती. खेर यांचे राजकारण भाषा आणि प्रांतवादा पलीकडील होते. १९३७ मध्ये मुंबई राज्य झाले. त्या मुंबई राज्याचे प्रथम मुख्यमंत्री बनण्याचा मान बाळासाहेब खेर यांना मिळाला. या मुंबई राज्यात कर्नाटक आणि गुजरातचा बराचसा भाग समाविष्ट होता. त्या सर्वाचा विश्वास आणि आदर खेर यांनी संपादन केला होता.
अॅड. पाटणे पुढे म्हणाले की, बांद्रा पूर्वेला असलेली खेरवाडी हे त्यांचे उचित स्मारक म्हणता येईल. त्याची कृतज्ञता म्हणून या वस्तीला ‘खेरवाडी’ हे नाव पडले. त्यांच्या स्वभावातील नि:स्पृहता, सभ्यता, स्वभाव सर्वानी वाखाणला होता. लोकांना आपलेसे करण्यासाठी अंगभूत सचोटी आणि विनम्रता त्यांच्या कामी येई. आजूबाजूला उत्तुंग व्यक्तिमत्त्वे असताना खेर यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले ते केवळ वैचारिक स्तरामुळे. बाळासाहेब दोनदा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले. पहिला कालखंड ब्रिटिश राजवटीतील तर दुसरा स्वतंत्र भारतातील. पहिला कालखंड आदर्शवादी, तर दुसरा नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतातील फाळणी आणि प्रांतवादाच्या प्रश्नांमुळे परीक्षेचा ठरला.
रत्नागिरी येथील राहते घर आणि शेतजमीन सर्वोदय छात्रालयास देणगी, अंबरनाथ येथील घर आणि आमराई नर्सिग होमसाठी देणगी, बडोदा आणि धारवाड विद्यापीठांची स्थापना आणि एसएनडीटी विद्यापीठाला मान्यता, इंग्लंडमधील राजदूत, भाषा आयोगाचे अध्यक्ष, हे सारे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व दर्शवते. सध्या राजकारणाचा स्तर व संस्कृती झपाट्याने घसरत असताना बाळासाहेब खेर यांच्या साधनशुचतेच्या राजकारणाची प्रकर्षाने आठवण येते, असेही अॅड. विलास पाटणे यांनी स्पष्टपणे सांगितले.
द्रष्टे नेते बाळासाहेब खेर
खेर यांचे सारे समाजकारण आणि राजकारण हे कायम बहुलक्षी राहिले. त्यात जबाबदारीचे भान, इतिहास आणि भविष्याचा संदर्भ सापडतो. साहजिकच त्यात एक द्रष्टेपण दिसून येते. काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी केलेले आंदोलन बॉम्बे लॉ जर्नलचे संपादक, बहिष्कृत हितकारिणी संस्थेचे उपाध्यक्ष, श्रद्धानंद महिलाश्रम या संस्थेचे अध्यक्ष ही त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यमुनाबाई खेर ट्रस्टचे ॲड संदीप ढवळ यांनी केले. या वेळी त्यांनी यमुनाबाई खेर ट्रस्टचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील संकल्प आणि विविध पुरस्कारांबद्दलची माहिती दिली. ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, संस्थेचे कामकाज आता छात्रालयाचे माजी विद्यार्थी चालवत आहेत. अॅड. पाटणे यांनी सुचवल्याप्रमाणे दूरदृष्टी ठेवून संस्था काम करेल. त्याकरिता सर्वांची मदत मिळेल.
याप्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, बाळकृष्ण शेलार यांच्यासह प्रा. बीना कळंबटे, डॉ. शरद प्रभुदेसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, श्रद्धा कळंबटे, अॅड. सुजित झिमण, समाजातील नामवंत मंडळी उपस्थित होती. वीणा काजरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांचा गौरव
या वेळी बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार अक्षय भातडे, कै. सौ. गीते शिष्यवृत्ती साहिल गोताड, कै. राजाराम पांगम शिष्यवृत्ती विशाल लटके, कै. पद्मजा व कै. विष्णू बर्वे शिष्यवृत्ती आदित्य शिवगण आणि तात्या-ताई शिष्यवृत्ती अनिरुद्ध सकपाळ या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्याला रत्नागिरी शहरात मोफत राहण्याची सुविधा मिळाली. शिस्तीमुळे खूप काही शिकायला मिळाले. जेवण बनवता येऊ लागले, जीवनात अमूलाग्र बदल होत असल्याचे आवर्जून सांगितले.
www.konkantoday.com