दाभोळ खाडीतील मृत मासे प्रकरणी लवकरच उच्चस्तरीय बैठक,उद्योगमंत्री सामंत; दाभोळ खाडी संघर्ष समितीकडून चर्चा
दाभोळ खाडीतील मासे मृत झाल्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीतून मांडला. प्रकाराबाबत उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्यात आली. या विषयावर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री सामंत यांनी दाभोळ खाडी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
काही दिवसांपूर्वी दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याचे आढळून आले होते. या संदर्भात दाभोळ खाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधून माहिती दिल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करत मृत मासे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.
या विषयाच्या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. लोटे औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमधून केमिकलयुक्त दूषित सांडपाणी सोडल्यामुळे दाभोळ खाडीतील दहा गावांमधील मासे मृत झाले. दाभोळ खाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामचंद्र पडवळ या विषयी शासनाकडे तक्रार करत आहेत; मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही.
www.konkantoday.com