कुसुमताई पतसंस्थेवर ठेवीदार, कर्जदारांचा वाढता विश्वास
रुग्ण मदत, शैक्षणिक उपक्रमासह कै. कुसुमताई अभ्यंकर यांच्या नावाने देणार पुरस्कार
अध्यक्ष प्रा. नाना शिंदे, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी मानले आभार
रत्नागिरी । प्रतिनिधी :
डिजिटल शाखेसह क्यूआर कोडसह कार्यरत असणाऱ्या कुसुमताई सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षाखेर ३५ लाखांचा नफा मिळवला असून पतसंस्थेची वसुली ९६% झाली आहे अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी दिली.
सर्वसामन्यांच्या आमदार म्हणून आजही लोकप्रिय असलेल्या कै. आ. कुसुमताई अभ्यंकर यांच्या नावाने सुरु केलेल्या या पतसंस्थेने स्थापनेपासूनच कुसुमताईंचा सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा वसा कायम राखत आपली वाटचाल केली आहे. त्यामुळे ठेवीदारांची विश्वासार्हता कायम राहिली आहे. कुसुमताई पतसंस्थेने नेहमीच प्रगतीची पावले टाकली असून यंदाही आर्थिक वर्षाखेर ३५ लाखांचा नफा मिळवला आहे. तर पतसंस्थेची वसुली ९६% आहे. भागभांडवल ६२ लाख, ठेवी ३१ कोटी ८५ लाख, कर्जे २३ कोटी ६७ लाख तर पतसंस्थेची गुंतवणूक १० कोटी इतकी आहे असे श्री. शेवडे यांनी सांगितले.
पतसंस्थेने सहकार कायदयातील सर्व तरतुदी पूर्ण केल्या असून पतसंस्थेची डिजिटल शाखा असून क्यू आर कोड सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची सोनेतारण कर्जाची वाढती मागणी असून दररोज ५ लाख रुपये पिग्मी जमा होत आहे. पतसंस्थेची ५००० सभासद संख्या असून सभासदांचा सार्थ विश्वास असल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शाखांमध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरु केल्यामुळे ग्राहकांची विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगली सोय उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
आगामी वर्षांमध्ये पतसंस्थेच्या नफ्यातील काही पैसे गरजू रुग्णांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत, तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर कै. आमदार कुसुमताई अभ्यंकर यांचे नाव आणि महती नवीन पिढीला समजावी यासाठी पुढील वर्षापासून समाजातील महिलांना त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही श्री. शेवडे यांनी सांगितले. पतसंस्थेवरील विश्वासाबद्दल अध्यक्ष प्रा. नाना शिंदे, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी सभासद, कर्जदारांचे आभार मानले.