बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक वर वन विभागाची मोठी कारवाई

0
192

लाकडाने भरलेले दोन ट्रक वन विभागाने घेतले ताब्यात

खेड : मुंबई गोवा महामार्गावरून बिना परवाना अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले दोन ट्रक एका राजकीय पुढाऱ्याचे असल्याची चर्चा आज खेड परिसरात सुरु होती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून ट्रक मालकाच्या विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने केलेल्या या कारवाईमुळे राजाश्रयाखाली लाकडाचा चोरटा व्यापार करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

खेड तालुक्यच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जंगल उजाड करून काही लाकूडमाफिया विनापरवाना लाकूड वाहतूक करत आहेत. त्यांच्यावर काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांचेही फारसे काही चालत नाही. गेली अनेक वर्ष हा गोरख धंदा बिनदिक्कतपणे सुरु आहे. सह्यद्रीच्या खोऱ्यातील मोठमोठी जंगले उजाड करून लाकूडमाफिया आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे हात बांधलेले असल्याने अधिकारी डोळ्याला झापडे लावून महामार्गावरून धावणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रककडे कानाडोळा करत आहेत.
जंगलतोड करण्यासाठी आणि तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वनविभागाचा परवाना असणे आवश्यक आहे. वनविभागाच्या परवान्याशिवाय जंगल तोडता देखील येत नाही आणि वाहतूक देखील करत येत नाही परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे असलेले लाकूडमाफिया सगळं काही मॅनेज करून जंगलं उजाड करत आहेत.
लाकूड तोड करण्यासाठी वनविभागाकडून जितकी झाडे तोडण्याची परवानगी दिलेले असते तितकीच झाडे तोडणे गरजेचे आहे. मात्र इथे दहा झाडे तोडण्याची परवानगी असेल तर १०० झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. लाकूड माफिया कशा प्रकारे जंगलतोड करतात हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहित नाही असे नाही मात्र त्यांचे हात बांधलेले असल्याने वनविभागाचे अधिकारी जंगलतोडीकडे फिरकत देखील नाहीत हे वस्तुस्थिती आहे.
मंगळवारी रात्री भरणे नाका येथे वनविभागाने जी कारवाई केली ती कर्तव्य म्हणून केली असे म्हणता येणार नाही. लाकूड मालाने खचाखच भरलेल्या काही गाड्या भरणे नाका येथे उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिल्यावर त्या गाड्यांचे शूटिंग करण्यात आले त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना रीतसर पत्र देऊन त्या गाड्यांमध्ये असलेल्या लाकूड मालाच्या तोडीचा आणि वाहतुकीचा परवाना आहे का याची विचारणा करण्यात आली. वनविभागाच्या अधिकऱ्यानी सुरवातीला चालढकल करण्याच्या प्रयत्न केला मात्र गाड्यांचे केलेले शूटींग थेट वनमंत्रालयाला पाठविण्यात येईल असे सांगितल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि नाईलाजास्तव कारवाई करावी लागली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाखुशीने का होईना ज्या दोन गाड्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली त्या दोन्ही गाड्या एका राजकीय पुढाऱ्याच्या असून हा राजकीय पुढारी शिंदे गटाचा लोकप्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. वनाधिकाऱ्यांनी कारवाई टळावी यासाठी सगळ्या बाजूंकडून प्रयत्न झाले मात्र गाड्यांची शूटिंग वरिष्ठ कार्यालयाला पोचणार या भीतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नाखुशीने का होईल कारवाई करणे भाग पडले.
वनविभागाने केलेल्या या कारवाईची चर्चा आज दिवसभर खेड शहरात सुरु होती, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलेली हे कारवाई या पुढेही अशीच सुरु ठेवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here