तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीला 7 वर्षे सश्रम कारावासासह 15 हजार रुपये दंड
राजापूर : पायवाटेने घरी जाणार्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीला न्यायालयाने मंगळवारी 7 वर्षे सश्रम कारावासासह 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तालुक्यातील पांगरे गावमळावाडी येथे सव्वा तीन वर्षांपूवी ही घटना घडली होती. सुरेंद्र सुरेश बाईत (वय 22, रा. कोंडये तर्फे सौंदळ मधलीवाडी, राजापूर) असे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, पीडित तरुणी ही त्यावेळी 12 वीमध्ये शिकत होती. दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा असल्याने ती सकाळी 7.45 वा.कॉलेजमध्ये जाऊन 11.45 वा. घरी जात होती. ती पांगरे गावमळावाडी येथील पायवाटेने घरी जात असताना त्याच ठिकाणी गुरे चारण्यासाठी गेलेल्या सुरेंद्र बाईतने पीडितेला पाहिले. ती एकटीच असल्याची संधी साधत सुरेंद्रने तिला जंगलमय भागात फरफटत नेले. ओरडलीस तर तुला मारुन टाकीन, अशी धमकी देत तिच्या शरीरावर ओरबाडून तसेच चावे घेऊन जखमा करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी पीडितेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. राजापूरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एम. वालावलकर यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल सावळी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी आरोपीला सश्रम कारावास व 10 हजार दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कैद, 6-6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल किरण सकपाळे यांनी काम पाहिले.