आमदार राजन साळवींसह ठाकरे सेनेचा रडीचा डाव : महेश खामकर यांची टीका
लांजा :तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत संस्था मतदारसंघातील 19 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगीर येथे बंद खोलीत नेऊन ठेवले. पाच दिवसांनी त्यांना निवडणुकीसाठी बाहेर आणत आमदार राजन साळवी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी रडीचा डाव खेळला आहे. यामुळे आमदार राजन साळवी यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला भाजपाचे लांजा तालुकाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर यांनी लगावला आहे.
लांजा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली होती. या निवडणुकीत संघाच्या 17 पैकी 15 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे हे निर्भेळ यश नसून एकूणच झालेल्या घडामोडीमध्ये शिवसेनेने रडीचा डाव खेळल्याची टीका भाजपा तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी केली आहे. सोसायटी संस्था मतदारसंघातील 19 लोकांना देवाच्या नावाखाली, उदगीर येथे शपथ घेऊन त्यांना बंद खोलीत ठेवले होते. त्यांचे मोबाईल बंद करून पाच दिवसांनी त्यांना निवडणुकीसाठी समोर आणले. म्हणजेच शिवसेना पदाधिकार्यांना आपल्या मतांवर, आपल्या पदाधिकार्यांवर विश्वास नव्हता का? असा सवाल खामकर यांनी केला.
अशा प्रकारचे कारस्थान करून संघ जिंकला म्हणजे मोठा तीर मारला असा होत नाही. खुला मतदारसंघातून शिवसेनेचे माजी अर्थ शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांचा भाजपाचे पदाधिकारी गुरुप्रसाद तेली यांनी दारूण पराभव केला आहे. त्याचबरोबर सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या धनिता चव्हाण यांनीदेखील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नितीन शेट्ये यांच्या पत्नीला पराभूत केले आहे. तर शिवसेनेचे शरद चरकरी हे बाद मतावर निवडून आले आहेत. त्याबाबत आपण न्यायालयात रितसर दावा देखील केलेला आहे. म्हणूनच जरी संघ निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 15 सदस्य निवडून आले असले तरी त्यांचे हे प्रामाणिक आणि निर्भेळ यश नाही. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी आत्मपरीक्षण करावे. तसेच संघ ही शेतकर्यांची संस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षीय राजकारण देखील त्यांनी करू नये, असेही खामकर यांनी म्हटले आहे.