स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांनी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार

0
81

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी दि. 24 फेबृवारी 1931 साली पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी 18 पगड, 12 बलुतेदार समाजांना सोबत घेऊन अ. भा. भंडारी समाज महासंघ आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज, पतितपावन मंदिर संस्थेने पुढाकार घेतला आहे. मंदिराचा कलशारोहण वर्धापन दिन आणि भागोजीशेठ यांची पुण्यतिथी याचे औचित्य साधून 24 फेब्रुवारीला तीन हजार लोक यात सहभागी होतील, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
मंदिराच्या आवारातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये पत्रकार परिषेदत राजीव कीर यांनी दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, भागोजीशेठ यांचे 24 फेबृवारी 1944 ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सहभोजनाचा कार्यक्रम बंद पडला होता. परंतु सर्व समाजाला पुन्हा एकत्रित आणण्याकरिता भंडारी समाज व पतितपावन मंदिर संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल व प्रतिवर्षी कार्यक्रम करणार आहोत.
भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 24 ला सकाळी 9 ते 11.30 या वेळेत शहरातून वाहन फेरी काढण्यात येईल. फेरीची सांगता पतितपावन मंदिरात होईल. त्यानंतर सभा होईल. दुपारी 12.30 ते 3 या वेळेत सहभोजन कार्यक्रम होईल. मंदिराच्या समोरील भागात मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वीर सावरकरांवर लिखाण करणार्‍या व्यक्ती, कलाकारांचा प्रातिनिधीक सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.
1931 मध्ये रत्नागिरीमध्ये वीज पोहोचली नव्हती. परंतु, रस्त्यावर उंडीच्या तेलाचे दिवे पाजळले जायचे. तेलाचे दिवेच होते. सहभोजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी शहर तेजोमय करण्यात आले होते. यंदाच्या कार्यक्रमाची सर्व धुरा भंडारी समाजाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. समाजातूनही मदत मिळणार आहे. पुढील वर्षापासून समाजाच्या सर्व सहयोगातून हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. भागोजीशेठ कीर यांचा दातृत्वगुण व कठोर कष्ट, शिस्तीने काम करण्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.
या पत्रकार परिषदेला नाभिक समाजाचे श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण, तेली समाजाचे दीपक राउत, कुंभार समाजाचे प्रकाश उर्फ बावाशेठ साळवी, त्वष्टा कासार समाजाचे अनिल पोटफोडे, पतितपावन मंदीर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, वैश्य समाजाचे राजन मलुष्टे भंडारी समाजाचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, कुमार शेट्ये, कांचन मालगुंडकर, कटबु समाजाचे बी. टी. मोरे, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here