
लांजा तालुक्यातील झापडे, विलवडे गावांमध्ये काजू बागेला आग
लांजा तालुक्यातील झापडे आणि विलवडे या दोन गावांमध्ये काजू आणि आंबा बागांना लागलेल्या आगीत आंबा, काजू, कोकम या पिकांची सुमारे 800 झाडे जळून खाक झाली आहेत. यामध्ये मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत संबंधितांनी गुरुवारी 19 जानेवारीला लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लांजा तालुक्यातील झापडे ब्राह्मणवाडी येथील आनंद अशोक राजाध्यक्ष (वय 48) यांच्या घराशेजारील असलेल्या काजूच्या बागेला अज्ञात व्यक्तीने गुरुवार दि.12 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लावली. यात त्यांची धरती साडेतीनशे काजूची कलमे जळून राख झाली आहेत. याबाबतचा पंचनामा तलाठी सिद्धी शिवलकर यांनी केला असून एका झाडामागे सुमारे आठ हजार रुपये प्रमाणे 28 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आनंद राज्याध्यक्ष यांनी म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावल्याचे आनंद राज्याध्यक्ष यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शुक्रवारी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस हेड. कॉन्स्टेबल नासिर नवलेकर हे करत आहेत. विलवडे येथे शनिवार दि.14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत पांडुरंग नारायण खामकर यांच्या काजू बागेतील 400 काजू झाडे, 100 आंबा, कोकम दहा, बांबू 10 आदी झाडे जळून खाक झाली आहेत. याप्रकरणी तलाठी रवींद्र वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आगीत पांडुरंग खामकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी देखील गुरुवारी 19 जानेवारी रोजी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही आग देखील अज्ञात व्यक्तीने लावल्याचे पांडुरंग खामकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचा तपास लांजा पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करीत आहेत.