सायकल संमेलन हे कौतुकास्पद : उद्योजक अण्णा सामंत
रत्नागिरी : सायकल संमेलन हे खूपच कौतुकास्पद आहे. फक्त अभ्यासाकडे लक्ष न देता पालकांनीही मुलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे (वर्ष दुसरे) उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर दर्शन जाधव, तृणाल येरूणकर, मिलिंद खानविलकर, डॉ. स्वप्नील दाभोळकर आणि प्रीतम पाटणे उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, दापोली, चिपळूण आणि खेड सायकलिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन यशस्वी झाले. संमेलनात सुमारे दोनशेहून अधिक सायकलप्रेमी, सायकलपटू, नागरिक सहभागी झाले.
जिल्ह्यात सायकलिंग कसे वाढेल, याकडे लक्ष देऊया. खेड, चिपळूण, दापोली, रत्नागिरीत क्लब आहेत. आता लांजा, संगमेश्वर, राजापूर येथेही क्लब स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने स्वतःसोबत एक तरी सायकलिस्ट घडवा, असे आवाहन महाराष्ट्र गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांनी केले.