शिक्षकांसाठी शिक्षक उमेदवारच हवा! गटारे, रस्त्यांची कामे करणारा नको, ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील : ना. उदय सामंत
रत्नागिरी : शिक्षकांसाठी शिक्षक उमेदवार ही भूमिका बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाची आहे. त्यामुळे प्राधान्याने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडून आल्यावर शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून रस्ते व गटारांवर निधी खर्च करणार्या शिक्षक आमदारांपेक्षा पराभवानंतरही शिक्षकांसाठी सातत्याने लढा देणार्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठिशी येथील शिक्षक मतदार ठाम उभा आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघामधून बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी होतील, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत पाली येथील ना. सामंत यांच्या निवासस्थानी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.ना. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आ. बाळाराम पाटील यांनी गेल्या सहावर्षात रस्ते व अन्य कामांवर निधी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. गत निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे म्हात्रे निवडून येतील, असे मत ना. सामंत यांनी व्यक्त केले.