माझी तारांगणाची सहल, एक सुंदर अनुभव
कामाला सुट्टी होती म्हणून आपल्या रत्नागिरी येथे नव्याने झालेल्या 3D तारांगणाला भेट दिली. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे तारांगण असे या तारांगणाचे नाव आहे. शहराच्या माळनाका परिसरात हे तारांगण सुमारे एक ते दीड एकर क्षेत्रात बांधलेले आहे. जाता येता त्या घुमटाकार “डोम”मध्ये काय दडलयं हे पहायची उत्सुकता या भेटीनिमित्ताने पूर्ण झाली.
महाड जवळच्या गावातून आलेल्या एका सहलीच्या चमूबरोबर अस्मादिकांनी प्रवेशिका खरेदी करुन तारांगणाच्या सुंदर वास्तूत प्रवेश केला. नवं कोरं पुस्तक उघडतांना जसं वाटतं अगदी तसं वाटलं. बरोबर शाळेतील विद्यार्थी. त्यामुळे आपोआपच माहोल तयार झाला.
छोट्या अंतराळवीराच्या प्रतिमेबरोबरोबर फोटु पण काढला.
तिकीट देणाऱ्या दादाने डोमचे गेट उघडून आत बसायला सांगितले. आम्ही हारीने स्थानापन्न झालो. लाल रंगाच्या मलमली खुर्चीवर रेलून बसलो तो आपोआप मागे कललो आणि डोक्यावर तो गोल घुमट दिसू लागला. अंधुक प्रकाश आणि मस्तपैकी थंडगार वातावरणात पुढची पंचेचाळीस मिनिटे जाणार होती. तेवढ्यात दुसऱ्या एका दादाने थ्रीडी गॉगल दिले आणि सूचना दिल्यावर लावा म्हणाला. त्यापूर्वी सर्वांचे भ्रमणध्वनी संच बंद करणेस सांगितले. मग प्रोजेक्टर वरुन डोमवर तिरंगा झेंडा अधांतरी फडकतांना दिसायला लागला आणि सगळेजण राष्ट्रगीतासाठी उभे राहिलो.
राष्ट्रगीतानंतर तारांगणाच्या माहितीची त्रिमितीय चित्रफीत दाखवण्यात आली. तिच्या सुरवातीला अवकाशात विहरणारी निळीशार पृथ्वी दाखवून हळूहळू नकाशावर रत्नागिरी व तारांगण दाखवण्यात आले. शाळेच्या सहलीला आलेल्या मुलांनी आश्चर्यौद्गारासहीत टाळ्या वाजवल्या.
पुढील चाळीस मिनीटे अगदी मंत्रमुग्ध करणारी होती. या वेळेत पृथ्वीवरुन इतर ग्रहांवर पाठवलेल्या उपग्रहांची माहिती मराठीतून दिली होती. या चित्रफितीच्या सुरुवातीला डायनोसोर युगापासून पृथ्वीवरील विविध स्थित्यंतराचे 3D चित्रीकरण एनिमेशन स्वरूपात होते. डायनोसोर आणि एक सर्प अगदी नाकासमोर येऊन जबडे उघडून गेले. सभागृहात त्यावेळी एकाच सुरात भयाचे उद्गार निघाले. पुढे मग सूर्यमाला व ग्रह यांच्या माहिती नंतर जे “रोबोट-रोव्हर ” व इतर कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले त्यांची माहिती चित्रफितीच्या निवेदिकाने दिली. पंचेचाळीस मिनिटे कशी संपली हे कळलेच नाही.
नेहरु तारांगणापेक्षा वेगळा अनुभव मात्र आला. अर्थात नेहरु तारांगण जुने व भव्य आहे. तसेच 2D आहे पण आपलं रत्नागिरीकरांचं तारांगण मात्र महाराष्ट्रातील पहिलं 3D व कोकणपट्टीतील एकमेव तारांगण आहे.
नुकतेच म्हणजे डिसेंबरच्या सोळा तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांचे हस्ते याचे लोकार्पण झाले आहे. माननीय उद्योगमंत्री सामंतसाहेब यांनी हे तारांगण होण्यासाठी अव्याहत प्रयत्न केले आहेत.
अजून ते पूर्णपणे चालू झाले नाही. आतील सायन्स सेंटर व आर्ट गैलरी सुरु झालेली नाही. पुढील काळात ती चालू होईलच. या तारांगणात विशेष जाणवले म्हणजे कुठेही चढायला उतरायला पायऱ्या नाहीत. “स्लोप” आहेत. याचा उपयोग दिव्यांग्य व्यक्तींना, वृद्ध, लहान मुले यांना होईल. डोमजवळील टेरेसवरही अशाच पद्धतीने जाता येते. भविष्यात येथे दुर्बीणीद्वारे अवकाश दर्शन करता येईल. एक्झिबिटस् ठेवण्यासाठी खूप स्पेस आहेत.
रत्नागिरीतील कलाप्रेमी, खगोलप्रेमी, विज्ञानप्रेमी विद्यार्थी व नागरिकांसाठी अजूनही काही उपक्रम येथे आयोजित करण्यात येणार आहेत. आजच रत्नागिरी आकाशवाणीने या तारांगणाच्या तांत्रिक सल्लागार असलेल्या श्री. कर्डिले साहेब यांची दीर्घ मुलाखत प्रसारित केली आहे. त्यांच्या मुलाखतीत तांत्रिक माहिती बरोबरच आर्थिक, सामाजिक बाबी व ईतर उपक्रम यांविषयी फारच मुद्देसूद माहिती दिली आहे.
रत्नागिरी नगरपालिकेचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि धाडसी आहे. पर्यटकांसाठी रत्नागिरी मध्ये आणखी एक डेस्टिनेशन या निमित्ताने निर्माण झाले आहे.
शाळा महाविद्यालयात विज्ञान शिकवले जातेच पण “पब्लिक” मध्ये विज्ञान प्रसाराची अनोखी संधी या वास्तुमुळे निर्माण झाली आहे.
नवजात अर्भकाप्रमाणे सध्या असलेलं हे तारांगण बाळसं धरुन नक्कीच गुटगुटीत होईल व दौडू लागेल. त्याच्या आरोग्याची काळजी, त्याचं कुपोषण होऊ नये याची काळजी खगोलप्रेमी – विज्ञानप्रेमी मंडळीनी मात्र घ्यायला हवी.
©️ बाबासाहेब सुतार, Gogte कॉलेज रत्नागिरी
www.konkantoday.com