नववर्षाच्या जल्लोषानिमित्त येणाऱ्या पर्यटकांसाठी एमटीडीसी सज्ज
रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या जल्लोषानिमित्त येणार्या पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, आयुर्वेदिक आणि नैसर्गिक अप्रतिम खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.
पर्यटनासाठी पूरक वातावरण पाहता पर्यटक कोकणातील समृद्ध निसर्गाकडे धाव घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे, रिसॉर्ट खुली असून, पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी सक्रिय झाली आहेत. त्यानुसार योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचे प्रस्तावित असून, स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचाही महामंडळाचा मानस आहे.
पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांचीही माहिती एमटीडीसीने संकेतस्थळ, फेसबूक आणि व्हॉट्सॅप ग्रुपच्या माध्यमातून देण्याची तयारी केली आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटक प्राधान्य देत असून, डिसेंबरमध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासांचे 90 टक्के आरक्षण झाले आहे. पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोविडविषयक भान ठेवून पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीने केले आहे.