आम्ही खोके घरी नेणारे नाहीत, तर जनतेला देणारे आहोत; रत्नागिरीच्या विकासाला 800 खोके : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : आम्ही खोके घरी नेणारे नाही तर देणारे आहोत. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांनी आम्हाला लोकांना द्यायला शिकवलंय. ज्यांना खोके माहिती आहेत, तेच आरोप करीत आहेत. 800 खोके आम्ही रत्नागिरीच्या विकासाला दिले. कोकणाने बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केले, त्या कोकणाला निधी देण्यात यापुढेही कमी पडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे केले.
शुक्रवारी सायंकाळी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये आठशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत, आ. शहाजीबापू पाटील, आ. भरत गोगावले, आ. योगेश कदम, आ. सदा सरवणकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहूल पंडित, किरणभैया सामंत व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे म्हणाले की या ठिकाणी आल्यावर बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कोकणच्या मातीत रुजले आहेत. स्व. बाळासाहेबांचे विचार पुसण्याचा, इतर पक्षांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ देणार नाही. आम्ही बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बहुमत युतीला दिले, मग सरकार कुणाबरोबर स्थापन केले? आम्ही सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापन केले आहे.भगव्या महासागराची लाट या ठिकाणी आल्याची पहायला मिळत आहे. आपुलकीची भावना जनतेमध्ये पहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप करण्याची स्पर्धा सुरू आहे. आम्ही मात्र कामातून उत्तर देऊ.
सांगली, कोल्हापूर, चिपळूण येथील महापूर पाहिला. मात्र, आम्ही मदतीचा हात दिला. यंत्रणा राबली नसती तर साथीचे आजार पसरले आहे. संकटसमयी बाळासाहेबांचा शिवसैनिक नेहमीच मदतीला धावत आला आहे. आम्ही आजही काम करीत आहोत, त्यामुळे अनेकजण आमच्या पक्षात प्रवेश करीत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.