राजापुरातील रिफायनरीवरून शिवसेनेत ट्विस्ट; उद्योग मंत्रालयाने खासदार राऊत, आ. साळवी यांना बोलावले बैठकीला

0
26

राजापूर : तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. या घडामोडींनी शिवसेनेतही ट्विस्ट निर्माण झाला आहे. उद्योग खात्याने प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी 11.30 वाजता विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. मुंबईतील बेलार्ड इस्टेट, वालचंद हिराचंद मार्ग येथील कृपानिधी बिल्डिंगमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला अधिकार्‍यांसोबतच फक्त खा. विनायक राऊत व आ. राजन साळवी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र स्थानिकांशी आधी चर्चा करा, मगच अशी भूमिका घ्या असे पत्र खासदार विनायक राऊत यांनी दिल्यामुळे या बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजापूर तालुक्यात नाणार येथे रिफायनरीला विरोध झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. रिफायनरीसाठी राज्यशासनाकडून प्रयत्न सुरू झाले असले तरी बारसू – सोलगावमध्ये प्रकल्प होणार की नाणारमध्ये? यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. या प्रकल्पाने राजापुरातील रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो.
खा. विनायक राऊत यांनी या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे लेखी पत्र राज्याच्या उद्योग मंत्रालयाला दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात या प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा, सुसंवाद आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आधी बैठक घ्यावी, असे नमूद केले आहे. आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने आहोत. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिफायनरीवरून पुन्हा घडामोडी घडू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here