ऐकावं ते नवलंच! तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले

खेड : तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पालांडे-देशमुख यांनी दिली आहे. याप्रकरणी अज्ञातावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तळवट येथील धरणामध्ये चालू वर्षी पाणीसाठा करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर मुख्य विमोचक द्वार कुलूप व साखळी यांच्या सहाय्याने बंद केले होते. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून धरणातून पाणी सुटल्याचे गावकर्यांच्या निर्दशनास आले असता धरणातील गाळ काढण्याच्या उद्देशाने नातूवाडी उपविभागामार्फत पाणी सोडण्यात आल्याची अफवा परिसरात पसरवण्यात आली होती. परंतु दि. 9 नोव्हेंबर रोजी प्रकल्पाचे शाखा अभियंता यांच्या क्षेत्रीय भेटीच्यावेळी अज्ञात व्यक्तीकडून सदर विमोचकास बसविण्यात आलेले कुलूप व साखळी तोडून दार उघडून पाणी सोडण्यात आले असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब ही अंत्यंत गंभीर स्वरूपाची असून भविष्यात उन्हाळ्यात धरणामध्ये पाणीसाठा न राहिल्यास, तळवट खेड, तळवट जावळी, तळवट पाली, धामणंद, कुंभवली, कासई, कावळे वावे, कुरवळ खेड, कुरवळ जावळी, मुसाड, साखर, मुसाड चांदे, मुसाड खुर्द, निभार्डे, काडवली, आंबडस, केळणे, पाली, खांदाटपाली, दळवटणे, कोळकेवाडी इत्यादी गावामध्ये पाणी टंचाई तसेच शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button