जागतिक पातळीवर ‘कोंकणातील कातळशिल्प’ शोध ही पुरातत्वीय दृष्ट्या 21व्या शतकातील महत्वपूर्ण घटना – डॉ वसंत शिंदे ( पुरातत्व शास्त्रज्ञ, (माजी)कुलगुरू डेक्कन महाविद्यालय)
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी ( DST) संबंधित विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञांची कोंकणातील कातळशिल्प ठिकाणांना भेट आणि चर्चासत्र संपन्न.
कोंकणातील कातळशिल्प रुपी अश्मयुगीन वारसा संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवरून एक आश्वासक पावूल —-
गेल्या काही वर्षात दक्षिण कोंकणातील कातळ सड्यांवरून विविध ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने कातळशिल्प जगासमोर आली आहेत. यापैकी 9 ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ प्राथमिक यादीत समावेश झाला आहे. ही देशाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. कोंकणातील हा वारसा शोध, संरक्षण आणि संवर्धन या सर्व पातळीवर रत्नागिरी मधील सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ सुरेंद्र ठाकूरदेसाई स्वखर्चाने सर्वोतोपरी सर्व पातळीवरून प्रयत्न करत आहेत. डॉ तेजस गर्गे, श्री ऋत्विज आपटे यांची तोलामोलाची साथ लाभली आहे. किंबहुना एक टीम म्हणून काम चालू आहे म्हटले तरी हरकत नाही. एकंदर कामाची दखल घेत —-
कोंकणातील कातळशिल्प विषयावर सखोल संशोधन व्हावे. त्याचे जतन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून कातळशिल्प परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी स्थानिक पातळीवर काम करणारी निसर्गयात्री संस्था व पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन यांना आधुनिक तंत्रज्ञान तसेच विविध ज्ञान शाखांमधून संशोधनाची जोड मिळावी यासाठी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार’ यांनी पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने या विभागाशी संबंधित विविध शास्त्रज्ञानी दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2022 रोजी कोंकणातील कोळंबे, रुंढेतळी, बारसू, कशेळी, उक्षी, देऊड इत्यादी ठिकाणी भेट दिली. त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी एक चर्चा सत्र पार पडले.
या शास्त्रज्ञांमध्ये मा. श्री अखिलेश झा ( CCA, DST New Delhi) यांच्या पुढाकाराने DST समिती सदस्य
प्रो. डॉ वसंत शिदे ( पुरातत्व शास्त्रज्ञ, माजी कुलगुरू डेक्कन कॉलेज, पुणे सध्या CCMB, Hydrabad येथे कार्यरत), प्रो. मोहन राघवन ( IIT, Hyderabad), डॉ. अनिश कुमार ( IGCAR, kalpkkam), डॉ. श्रीयश ( JNU, New Delhi), श्री. प्रमोद एस ( DST, New Delhi), डॉ. दिनकर कांजीलाल (JUSC, New Delhi), Dr. M.J. Shankaran ( CEO, Pravartak, IIT Madras), डॉ. अनुपम साहा ( Art conservation – Restoration consultant )
यांसोबत डॉ. तेजस गर्गे ( Director, State Archaeology directorate) यांचा समावेश होता. यावेळी सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ सुरेंद्र ठाकूरदेसाई, ऋत्विज आपटे ( Archaeologist), तेजस्विनी आफळे ( Conservation architect), राहुल नरवणे, सायली खेडेकर, श्री सतीश ( Drushyam communication, Pune ) यांसोबत आमच्या पाठीशी कायम उभे असणारे श्री सुहास ठाकूरदेसाई उपस्थित होते.
क्षेत्र भेटी दरम्यान कातळशिल्प विविध पैलुंवर सविस्तर चर्चा झाली.
(यावेळी डॉ वसंत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ” जागतिक पातळीवर पुरातत्वीय दृष्ट्या 21 व्या शतकातील हा महत्वपूर्ण शोध असल्याचे व्यक्त केले ” आणि टीम निसर्गयात्रीने उभे केलेल्या कामाप्रती अभिनंदन केले. )
ह्या शोधकार्याचे त्याच्या संशोधनाचे, संरक्षण संवर्धन करण्याचे काम आम्हास लाभत आहे हे आमचे भाग्य. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.)
कातळशिल्प ठिकाणांना झालेल्या भेटी नंतर झालेल्या चर्चा सत्रामध्ये कोंकणातील कातळशिल्प ही जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण असून मानवी इतिहासातील एक समृद्ध दालन आहे. आपल्या देशाला लाभलेला हा वारसा ठेवा जतन संवर्धन होणे त्यावर सखोल संशोधन होणे ही गरज आहे. यासाठी कातळशिल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारून स्थानिक पातळीवर काम करणारे श्री सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ सुरेंद्र ठाकूरदेसाई, ऋत्विज आपटे – टीम निसर्गयात्री संस्था तसेच राज्य पुरातत्व विभाग यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या अंगाने आवश्यक पाठबळ मिळण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
कोंकणातील कातळशिल्प हा अखंड भारत देशाने गौरवावा, अभिमान बाळगावा असा समृध्द वारसा ठेवा आहे. याचा शोध, संरक्षण संवर्धन यासाठी आम्ही सर्वकाळ प्रयत्नशील आहोतच. या कातळशिल्प संरक्षणातून परिसराचे, येथील जैवविविधतेचे देखील जतन होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून परिसरात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांनी घेतलेला पुढाकार आमच्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
आमच्या पाठी ठामपणे उभे रहाणारे मा. श्री अखिलेश झा तसेच डॉ. तेजस गर्गे यांचे विशेष धन्यवाद आणि आभार.
सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ सुरेंद्र ठाकूरदेसाई.
ऋत्विज आपटे.