कर्ला ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा मोर्चा
रत्नागिरी : कर्ला ग्रुप ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराविरोधात गुरूवारी येथील शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. गावातील रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक सुविधांकडे दुर्लक्ष, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यात अपयश आदी समस्या ग्रामपंचायतीने तातडीने सोडवाव्यात. अन्यथा यापेक्षाही वारंवार जनआंदोलनाद्वारे जाब विचारण्याचा इशारा या मोर्चावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. गुरूवारी पंचायत समितीचे माजी सदस्य नदीम सोलकर, मुल्ला, पारकर आदींच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून कारभाराचा निषेध नोंदवला.
येथील मस्जिद ग्रेव्हयार्ड स्कूल ट्रस्ट, कर्ला आणि जमातुल मुस्लिमीन कर्ला, इन्तिजामिया कमिटी कर्ला, कर्ला वेल्फेअर कमिटी, कर्ला ग्रामविकास कमिटी यांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. कर्ला गावात कचर्याचे साम्राज्य, पाण्याच्या अभावामुळे मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे, खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्थेने येथील नागरिक हैराण झालेले आहेत.
गावासमोर पाणीपुरवठ्याची समस्या उभी आहे. नागरिकांना गढूळ, अशुध्द पाणी आणि त्यामुळे सर्वांच्याच आरोग्यावर परिणाम होऊ लागलेले आहेत. शुध्द पाणी मिळणे व ते पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे मोर्चेकर्यांचे म्हणणे आहे. येथील सार्या समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे.