
‘सीआरझेड’च्या उल्लंघन प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्यासह अन्य दोघांना दापोली न्यायालयाचा समन्स
दापोली : मुरुड येथे बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट बांधकाम करीत असताना सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्यासह अन्य दोघांना दापोली न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यानुसार अनिल परब यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
साई रिसॉर्ट , सी कोच रिसॉर्ट यांचे बांधकाम करीत असताना पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत तयार केलेल्या सीआरझेड मापदंडांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल परब, सदानंद कदम, पुष्कर मुळे यांना दापोली न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बचावले आहे. याप्रकरणी रिसॉर्टचे बांधकाम करीत असताना सी आर झेड अधिसूचना 2011 नुसार नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बांधकाम झालेले आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यानंतर त्यांनी कलम 5 च्या तरतुदीनुसार ही नोटीस जारी केली. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 द्वारे दिनांक 31 जानेवारी 2022 च्या आदेशाद्वारे साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट यांना निर्देश देऊन अनधिकृत संरचना काढून टाकण्यास सांगितले होते. या आदेशाचे पालन झाले नसल्याने तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालयाने बनविलेल्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याने 14 डिसेंबरपर्यंत चौकशीकरिता माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सदानंद कदम, पुष्कर मुळे यांना दापोली कोर्टात हजर राहावे लागणार आहे.




