किनारी भागावर लक्ष केंद्रीत करणार : पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीचा वापर यापूर्वी दहशतवादी कारवाईसाठी झाला असल्यामुळे किनार्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी अधिक दक्षता बाळगली आहे. पोलीस यंत्रणेकडूनही सातत्याने सुरक्षेबाबत विविध उपाययोजना राबवल्या असून, त्या अधिक सक्षम होण्यासाठी लक्ष देण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर धनंजय कुलकर्णी यांनीही किनारी भागातील लँडिंग पाईंटवर लक्ष केंद्रीत केले असून, मच्छिमारांसह किनारी भागातील नागरिकांना सतर्क करताना त्यांच्यात जागृतीवर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभाला आहे. त्यामुळे किनारीभाग सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बाणकोट ते राजापूर या किनारी भागात असलेल्या सागरी पोलीस ठाण्यांना प्राधान्याने आपण भेटी देणार आहोत. याची सुरुवात जयगड, दाभोळ, पूर्णगड, शहर पोलीस ठाणे येथून करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा दलांना सतर्क करून त्यांना पोलीस दलाशी जास्तीतजास्त कसे कनेक्ट ठेवता येईल यावर विशेष भर दिला जाणार आहे. नेपाळमधून येणार्या व खलाशी म्हणून काम करणार्यांची परिपूर्ण माहिती पोलिसांद्वारे संकलित केली जात आहे. किनारी भागात काम करणार्या परराज्य व देशातील व्यक्तीची नोंद पोलीस दलाकडे असलीच पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.