जिल्ह्यात 5 हजार 860 हेक्टर क्षेत्र वनव्याप्त

रत्नागिरी : जिल्ह्यात लागवडीलायक नसलेल्या जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पडिक जमिनीव्यतिरिक्त लागवड न झालेल्या जमिनीचे क्षेत्रही असून यात मात्र थोडाफार फरक होत असला तरी त्याचा वेग फारच कमी आहे. पडिक जमिन लागवडीखाली आणणे किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरात आणणे त्या भागाच्या विकासाला चालना देणारे असते. रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 8 लाख 16 हजार 433 हेक्टर इतके आहे. त्यामध्ये सद्यस्थितीत 5 हजार 860 हेक्टर वनव्याप्त क्षेत्र आहे. बिगरशेती वापराखालील जमिन 21 हजार 178 हेक्टर असून लागवड लायक नसलेली म्हणजे पडीक जमिन क्षेत्र 1 लाख 97 हजार 918 हेक्टर इतके आहे. त्याचवेळी पडीक जमिनीव्यतिरीक्त लागवड न झालेली किंवा इतर कोणत्याही वापरात न आलेली जमिन 2 लाख 69 हजार 1 हेक्टर इतकी आहे.
जिल्ह्यात सुमारे 18 वर्षापूर्वी जंगलव्याप्त किंवा वनव्याप्त 5 हजार 860 हेक्टर इतके होते ते क्षेत्र 2020-21 मध्येही तितकेच आहे. बिगरशेती वापराखालील जमिनही 18 वर्षानंतर तितकीच म्हणजे 21 हजार 178 हेक्टर इतकीच राहिलेली आहे. मात्र, पडिक जमिनी व्यतिरीक्त लागवड न झालेल्या जमिनीत गेल्या 18 वर्षात थोडाफार बदल झालेला आहे. मंडणगड तालुक्यात 18 वर्षांपूर्वी म्हणजे सन 2002-2003 मध्ये पडीक जमिनीव्यतिरीक्त लागवड न झालेले क्षेत्र 2 हजार 924 इतके होते. ते आता 2 हजार 808 हेक्टरपर्यंत आले आहे.
दापोली तालुक्यात पडीक व्यतिरीक्त लागवड न झालेली एकूण जमिन 24 हजार 69 हेक्टर होती. ती आता 23 हजार 357 हेक्टरवर आली आहे. खेडमध्ये 22 हजार 764 हेक्टरवरून 22 हजार 419 हेक्टरपर्यंत आली आहे. चिपळूणध्ये 22 हजार 230 हेक्टर क्षेत्र पडिक व्यतिरीक्त लागवड न झालेले होते, ते आता 21 हजार 483 हेक्टरपर्यंत आले आहे. गुहागरात 21 हजार 506 हेक्टरवरून 20 हजार 321 हेक्टरपर्यंत पोहचले आहे.रत्नागिरी तालुक्यात 21 हजार 584 हेक्टर जमिन पडीक व्यतिरीक्त लागवड न झालेली होती, ती आता 21 हजार 315 हेक्टरपर्यंत आली आहे. संगमेश्‍वरात 16 हजार 377 हेक्टरवरून 14 हजार 209 हेक्टरपर्यंत पोहचली आहे. लांजा तालुक्यात 69 हजार 505 हेक्टरवरून तब्बल 14 हजार 467 हेक्टरवर आली आहे. राजापूर तालुक्यात सन 2002-2003 मध्ये 69 हजार 505 हेक्टर क्षेत्र पडीक व्यतिरीक्त लागवड न झालेले होते. हे क्षेत्र आता 66 हजार 522 हेक्टरपर्यंत आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button