चिपळूणमध्ये ठेकेदार संघटनेची नगर अभियंता यांच्या कामकाजाबाबत नाराजी

0
172

चिपळूण : नगर परिषदेत विविध विकासकामे करणार्‍या ठेकेदार संघटनेने नगर अभियंता यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्‍त करणारे पत्र मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिले आहे. त्यामध्ये नगर अभियंता परेश पवार यांच्याकडून निविदा प्रक्रियेत चुकीचे धोरण आणि अंमलबजावणी व ठेकेदारांना होत असलेल्या त्रासाबद्दल दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी या पत्राद्वारे मागणी केली आहे.
नगर परिषद ठेकेदार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, गेली 20 ते 25 वर्षांपासून न. प. च्या बांधकाम विषयक होणार्‍या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये स्पर्धात्मकदृष्ट्या सहभागी होऊन काम करीत आहोत. आम्ही शहरातील कायमस्वरूपी रहिवासी आहोत. त्यामुळे कोणतेही काम करताना स्थानिक परिस्थिती व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवतो. मध्यंतरातील कोरोना काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. पूर्वीच्या तुलनेत कामे करणारे ठेकेदार वाढले आहेत. साहजिकच स्पर्धादेखील वाढलेली आहे. काही सधन मोठे ठेकेदार कामे मिळविण्यासाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निविदा सादर करतात. याचा त्रास छोट्या ठेकेदारांना होत आहे. अधिक स्पर्धा करून कामे करून घेतल्यामुळे योग्य दर्जाची होत नाहीत. त्यातच अभियंता पवार यांचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रामुख्याने निविदा प्राप्‍त झाल्यानंतर त्या उघडण्याचा निर्धारित कालावधी निश्‍चित केलेला असतो. परंतु पवार हे निविदा उघडल्यानंतर कागदपत्रांची तांत्रिक पडताळणी करण्यास जाणीवपूर्व विलंब व टाळाटाळ करीत आहेत. प्राप्‍त निविदांबाबतचा निर्णय देण्यास सहा ते सात महिने वाट पाहावी लागते. याबाबत विचारणा केली असता योग्य माहिती दिली जात नाही.
कामाचा हमी कालावधी संपल्यानंतर न. प. करारनामा पूर्वी व नंतर कामे सुरू असताना बिलातून वळते करण्यात आलेले झिपॉझिट रकमेचा परतावा देताना विलंब लावला जातो. निविदा प्रक्रियेत पारदर्शक दृष्टीने कोणतेही नियम पाळले जात नाहीत. मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देता यावीत, यासाठी बीड कॅपॅसिटी धोरणाची अंमलबजावणी करताना चुकीच्या तांत्रिक मुद्यांवर निविदा अपात्र ठरविल्या जातात. न.प.कडे चार अभियंते ठेकेदारी पद्धतीवर आहेत. मात्र, त्यांचे ठेकेदार बदलले तरी तेच कार्यरत आहेत. सलग चार-पाच वर्षे एकाच ठिकाणी काम केल्यामुळे त्यांचा इतर ठेकेदारांशी अधिक जवळचा संबंध निर्माण झाला आहे. त्यातूनच संबंधित ठेकेदार व मित्रांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  सेवा तत्त्वावरील अभियंता व नगर अभियंता आपले मर्जीतील काम देऊन इतर ठेकेदारांना त्रास देण्याच्या हेतूने संगनमताने काम करीत आहेत. असे पत्र देऊन संबंधितांची या बाबत दखल घ्यावी अशी मागणी ठेकेदार संघटनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here