विनापरवानगी लकी ड्रॉ स्पर्धा प्रकरणी खेडमध्ये मनसेच्या तिघांना अटक; वैभव खेडेकर नॉट रीचेबल

खेड : शहरातील मनसेच्या दोन पदाधिकारी व एका कार्यकर्त्याला गणेशोत्सवात विनापरवानगी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करून लोकांकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणुक केल्या प्रकरणी पाेलिसांनी गुरूवारी दि. २० रोजी अटक केली आहे. या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मनसेचे रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद नांदगावकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये व केदार वणजू अशी पाेलिस काेठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.
गणेशोत्सानिमित्त दि. ३१ ऑगस्ट ते दि.९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे पक्षातर्फे वैभव खेडेकर यांनी ‘खेडचा राजा’ या गणपती मूर्तीची स्थापना केली होती. लकी ड्रॉ तिकीट शंभर रुपयांना त्यांनी विकले होते. मात्र या ड्रॉचे तिकीट विकण्यासाठी जिल्हाधिकारी अथवा धर्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेतली नव्हती. याप्रकरणी अरबाज असगरअली बडे (वय २५, रा. डाकबंगला, खेड,जि रत्नागिरी) यांनी खेड पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या पाठोपाठ मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी वैभव खेडेकर व अन्य काही पदाधिकारी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर हे नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button