पोलिस अधिकार्यांसह कर्मचारी चिपळुणात ठाण मांडून; तपासासाठी सात पथके नेमली
चिपळूण : मंगळवारी रात्री चिपळूण शहरातील पाग भागातील आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोलने भरलेली बाटली, दगड, स्टम्प आढळून आले. या हल्ला प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुरुवारी रात्री चिपळुणात श्वान पथक दाखल झाले. ते याच परिसरात घुटमळले. काही ठसेदेखील पोलिसांनी घेतले आहेत.तपासाच्या कामासाठी सात पथके तयार केली आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, चार उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूणमध्ये फौजफाट्यासह ठाण मांडून आहेत. खेड, रत्नागिरी, दापोली येथील पोलिस अधिकारी चिपळुणात कार्यरत आहेत. आ. भास्कर जाधव यांच्या घरासमोरील तसेच पाग परिसर, बाजारपेठ या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. संशयितांचे मोबाईल देखील तपासले जाणार आहेत. घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी करत आहेत.